Take a fresh look at your lifestyle.

सावधान : पारनेर तालुक्यात कोरोना पाठोपाठ आलाय ‘हा’ गंभीर आजार

एकाचा वृद्धाचा घेतला बळी 

पारनेर : कोरोना महामारीमुळे ठप्प झालेले जनजीवन हळू हळू पुर्वपदावर येत असतनाचा आता स्वाईन फ्लूने जनतेच्या मनात धडकी भरविली आहे. तालुक्यातील पिंपरीजलसेन येथील एका ६० वर्षीय वृध्दाचा नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली.
यासंदर्भात वैद्यकिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पिंपरी जलसेन येथील साठ वर्षीय वृध्दाला सर्दी, खोकल्याचा जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना पारनेर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर त्यांना नगर येथे उपचारासाठी नेण्याच्या सल्ला देण्यात आल्यानंतर नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र त्यांची प्रकृती उपचारास प्रतिसाद देत नव्हती. त्यातच मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साठ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याचे डॉ. लाळगे यांनी सांगितले.
वृध्दाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर तालुका प्रशासन सतर्क झाले असून वृध्दाच्या कुटूंबातील व्यक्तींना वैद्यकिय पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, डॉ. लाळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार वृध्दाच्या मुलाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. पिंपरीजलसेनमध्ये वैद्यकिय पथकाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या तात्काळ चाचण्या करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये मोठी हानी झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला आहे. मात्र तो पुर्णपणे हद्दपार झालेला नाही. तशातच आता स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्हयात प्रशासनाच्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते २३ ऑगस्ट दरम्यान १२ रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहीती आहे.
कोरोना व स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजारांची लक्षण सारखीच आहेत. ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, धाप लागणे ही या आजाराची लक्षणे आहेत. रूग्णांनी लक्षणे जाणवल्यानंतर ताबडतोब शासकिय रूग्णालयात जाऊन तपासणी करून उपचार करावेत. या आजारावरील सर्व औषधे शासकिय रूग्णालयात उपलब्ध आहेत.
डॉ.प्रकाश लाळगे
तालुका वैद्यकिय अधिकारी
कोरोना महामारीने देशात शिरकाव केल्यानंतर पारनेर तालुक्यात पिंपरीजलसेन येथेच कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. आता स्वाईन फ्लूचा तालुक्यातील पहिला रूग्णही याच गावात आढळून आला आहे.