Take a fresh look at your lifestyle.

अरेरे वाईटच.. पारनेरातील ‘या’ रस्त्यावर पुन्हा अपघात

कंटेनरने महिलेला चिरडले

सुपा : प्रतिनिधी
नगर-पुणे महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्यास तयार नसून बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कंटनेरने दुचाकीस ठोकर दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली तर दोघे जखमी झाले.
यासंदर्भात समजलेली हकीगत अशी,शिरूरवरून नगरकडे येत असलेल्या दुचाकीस (क्र.एम.एच.१६ सी.झेड.०५२६) कंटनेरने (क्र.एम.एच.१२ एच.डी. ५३२१) पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील गंगुबाई बाबुराव सातपुते (वय ५८ रा. देउळगांव सिध्दी, ता. नगर) या कंटेनरखाली चिरडल्या गेल्या. तर दुचाकीवरील त्यांचा मुलगा व नात हे जखमी झाले.
दुर्घटनेनंतर कंटनेरचालक कंटेनर घटनास्थळी सोडून पसार झाला. घटनेची माहीती समजल्यानंतर सुपे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला तर जखमींना रूग्णालयात उपचारासाठी पाठविले.
दरम्यान् गेल्या पंधरा दिवसांत या महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत सात नागरीकांना आपले जीव गमावले आहेत. गेल्या रविवारी सुपे येथे हॉटेल व्यवसायिक बाळूशेठ पवार यांचा सुपे येथील दौलत पेट्रोलपंपावर अपघात झाला. मालवाहू टेम्पो व दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाळूशेठ यांचे रविवारी सायंकाळी नगर येथे उपचारादरम्यान निधन झाले. या महामार्गावरील अपघात थांबविण्यासाठी तहसिलदार, पोलिस निरीक्षक, महामार्ग पोलिस, आरटीओ, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची नुकतीच बैठक होऊन उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बैठक होऊन एक दिवस उलटला नाही तोच पुन्हा अपघात झाल्याने या महामार्गावरील वाहतूक आणि नियमित होणाऱ्या अपघातांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.