Take a fresh look at your lifestyle.

गुड न्यूज : पारनेरातील ‘या’ १६ गावांची पाण्याची वणवण थांबणार !

पाणी योजनेसाठी ३८ कोटींचा निधी

पारनेर : कान्हूरपठारसह १६ गावांच्या पाणी योजनांसाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३८ कोटी ४८ लाख ८० हजार रूपयांचा निधी मंजुर केल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. बंद पडलेली ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी आ. लंके यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून लवकरच हे काम सुरू होणार आहे.
तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कान्हूरपठार येथे विविध विकास कामांच्या भुमीपुजनासाठी आले असता त्यांच्याकडे या योजनेचे गाऱ्हाणे आ. लंके यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडले होते. या विजेच्या बिलामुळे या योजनेत नेहमी अडथळे येत असल्याची बाबही त्यावेळी पुढे आली होती. सौार प्रकाशावर ही योजना राबवून या योजनेची अडचण कायमची दुर करण्याची ग्वाही त्यावेळी मुश्रीफ यांनी दिली होती. मुश्रीफ यांच्या सुचनेनंतर आ.नीलेश लंके यांनी या योजनेचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर सादर केला होता.
मंत्री मुश्रीफ यांनी तत्कालीन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र देऊन या यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही या योजनेमध्ये लक्ष घातले होते.
जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या योजनेचे पुनरूज्जीवन करण्यात येणार असून जॅक वेलसह पंपहाउस योजनेतील अनेक गावांत वाढीव पाण्याच्या टाक्या, योजनेच्या पाईपलाईनची दुरूस्ती, जलशुध्दीकरण प्रकल्प, वीज बिल यासाठी हा निधी मंजुर करण्यात आला आहे. मांडओहळ धरणावरून ही योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. योजनेचे पुनरूज्जीवन झाल्यानंतर १६ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.