Take a fresh look at your lifestyle.

बंडू रोहोकलेंनी सांगितले शिंदे गटात जाण्याचे कारण…

स्थानिक नेतृत्वावरही डागली तोफ

पारनेर : शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास उर्फ बंडू रोहोकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी भेट घेतल्यानंतर रोहोकले यांचा शिंदे गटात प्रवेश होणार का ? या चर्चेला उधाण आले होते. अखेर रोहोकले यांनी सोमवारी उध्दव ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज त्यांची शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, मी बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसैनिक असून विकासाच्या मुद्दयावर शिंदे गटात प्रवेश केल्याचे रोहोकले यांनी ‘पारनेर दर्शन’शी मुंबईतून बोलताना सांगितले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी राष्ट्रवादीचे लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठाण संचलित भाळवणी येथील कोव्हीड सेेंटरला आर्थिक मदत केल्यापासून रोहोकले यांच्याविषयी शिवसेनेत संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते. ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चाही सुरू होत्या. मात्र राज्याच्या बदलत्या राजकिय समिकरणानंतर शिवसेनेत ठाकरे विरूध्द शिंदे असे दोन गट निर्माण होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. जिल्हा परिषदेच्या ढवळपूरी गटात रोहोकले हे शिवसेनेचे प्रबळ दावेदार समजले जात होते. मात्र हा गट आरक्षीत झाल्यानंतर माजी आ. विजयराव औटी यांनी रोहोकले यांना अपमानास्पद वाक्य वापरल्याने तसेच उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल करतेवेळी रोहोकले यांना डावलण्यात आल्याने ते नाराज होते.
तालुकाप्रमुख पदावर असतानाही स्थानिक पक्षश्रेष्ठींकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक व अधिकारावर असलेले बंधन यामुळे रोहोकले हे स्थानिक पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. मात्र त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली नाही. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर रोहोकले यांची त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली. स्थानिक ठाकरे गटाकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीला ते कंटाळले होते. विकास कामांसाठी इतर कोणत्याही पक्षाशी अथवा इतर लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवायचा नाही असा तालुका श्रेष्ठींचा शिरस्ता होता. त्यामुळेच भाळवणी गावच्या तसेच तालुक्याच्या विविध विकास कामांसाठी रोहोकले यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर ही पक्ष विरोधी कारवाई समजत त्यांना पदावरून पायउतार करण्याच्या हालचाली सेनेच्या तालुका श्रेष्ठींनी सुरू केल्या होत्या. रोहोकले यांचा शिंदे गटात प्रवेश होताच त्याच दिवशी मध्यवर्ती कार्यालयाकडून सेनेच्या तालुकाप्रमुख पदावर डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना विकास रोहोकले म्हणाले की, मी बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसैनिक आहे. मी शिवसेना सोडलेली नाही. सेना कोणाची याबाबत अद्याप सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी आपण मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली, यात गैर काय ? सर्वसामान्यांना सहज भेट देणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर त्यांनी भाळवणी येथील मेळाव्यास उपस्थित राहून तालुक्याचे सर्वांगिण प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याचेही रोहोकले यांनी सांगितले.
तर सातबारा बाहेर काढणार
आपण शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने सुसंस्कृतपणाबद्दल जाहिर चर्चा केली. कोण किती सुसंस्कृत आहे याची मला जाणीव आहे. याबद्दल मला बोलायला लाऊ नका. नाहीतर सर्व सातबाराच बाहेर काढील असा इशाराही विकास रोहोकले यांनी दिला.