Take a fresh look at your lifestyle.

‘या’ गावात आजही जपल्या जातात शुरवीरांच्या आठवणी !

मानवंदना देवून केला जातो आदर 

शिरूर : सतीश डोंगरे
संपूर्ण देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करीत आहे. देश आबादीत ठेवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा शूरवीरांची आज प्रकर्षाने आठवण आल्याशिवाय रहात नाही. शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तसेच भारत-चीन व भारत-पाकीस्तान युध्दात सहभागी झालेल्या शूर जवानांच्या आठवणींना ग्रामस्थांनी उजाळा दिला.
कै. हरीभाऊ श्रीपती गवारे हे सर्वात जुन्या काळी ३० सप्टेंबर १९३४ रोजी सैन्यात भरती झाले होते. ते सैन्यात जमादार म्हणून कार्यरत होते. त्यांनी १९४७ मध्ये भारत-पाक लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आफ्रिका, बर्मा आदी ठिकाणी ते कार्यरत होते. २९ सप्टेंबर १९५८ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
कै. बापुराव वामन गवारे हे १७ ऑक्टोबर १९४३ साली सैन्यात भरती झाले. त्यांनी हवालदार म्हणून गोवा, बर्मा, जावा सुमात्रा याठिकाणी सेवा बजावली होती. १९६१ मध्ये गोवा मुक्ती संग्रामात तसेच १९६२ च्या भारत-चीन लढ्यात त्यांचा सहभाग होता. २२ जुलै १९६४ रोजी ते सैन्यातून निवृत्त झाले.
कै. दत्तू केरू जगताप यांनी सुभेदार म्हणून सैन्यात अनेक वर्षे सेवा केली. १९६५ च्या भारत-पाक लढाईत आणि भारत-चीन लढाईत त्यांचा सहभाग होता. १० जून १९७८ मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले.
 कै. शहाजी दिनकर दळवी हे २६ जून १९७१ मध्ये सैन्यात भरती झाले. नायब सुभेदार म्हणून त्यांनी १९७१ भारत-पाक लढ्यात मोठे योगदान दिले. १९८९ मध्ये ते सैन्यातून सेवानिवृत झाले.
भारतीय माजी सैनिक संघाच्या कारेगाव शाखेच्या वतीने गावात दर्शनी भागात या शूरवीरांची त्यांनी केलेल्या देशसेवेच्या कामगिरीची माहिती फलकावर छायाचित्रासह लावण्यात आली आहे. माजी सैनिकांच्या वतीने मेजर शिवाजी नाना कोहोकडे, मेजर बंडूशेठ कोहोकडे यांच्या पुढाकाराने दरवर्षी गावात १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला या शूरवीरांना मानवंदना देऊन त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो.
आज प्रकर्षाने वडीलांची आठवण येते !
ये मेरे वतन के लोगो… हे देश भक्तीपर गीत ज्या ज्या वेळी ऐकतो त्यावेळी अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा आपसूकच ओल्या होतात. अन् पुढे वडीलांच्या आठवणीने गहीवरून येते. विशेषतः १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला वडीलांची प्रकर्षाने आठवण येते. आज देश अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे याचा मनापासून आनंद आहे.
आमच्या वडिलांनी जमादार म्हणून १९४७ साली झालेल्या भारत पाक लढ्यात महत्वाची भूमिका बजावली होती. याचा मनापासून अभिमान वाटतो.
– प्रभाकर गवारे
माजी सैनिक स्व. हरीभाऊ श्रीपती गवारे
यांचे सुपुत्र