Take a fresh look at your lifestyle.

पाच नक्षलवादी धाडले यमसदनी : ढोलेंना राष्ट्रपती शौर्य पदक

नगर जिल्ह्यातील पत्रकाराच्या चिरंजीवावर अभिनंदनाचा वर्षाव

शिरूर : सतीश डोंगरे
“गडचिरोली येथे सी- ६० या पोलीस विशेष कृती दलात कार्यरत असतांना किस्नेली चकमकीमध्ये नक्षलवाद्याशी जोरदार लढत देत त्यांनी पाच नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या या कल्पकता, नियोजनामुळे गडचिरोली येथे अनेक नक्षलवाद्यांना शरण आणण्यास भाग पाडले आणि पुढे ही चळवळ थंडावली”
पुणे ग्रामीणचे हवेली उपविभागिय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांना या अतुलनीय कामगिरीसाठी यंदाचे राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे. ढोले हे नगर जिल्ह्यातील पाथर्डीचे रहिवाशी आहेत. यापूर्वी देखील गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी साठी त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये गडचिरोली येथून विशेष कृती दलातून त्यांची हवेलीचे डीवायएसपी म्हणून बदली झाली. एक कर्तव्यदक्ष आणि दबंग अधिकारी म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यात प्रतिमा आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनेक गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे. राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांच्यावर पुणे आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भाऊसाहेब हे मूळ नगरच्या पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगावचे. पहिली ते पाचवीचे शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षक तेथेच सच्चिदानंद बंडोबा महाराज विद्यालयात झाले. वडील कैलास ढोले हे पत्रकार असल्याने अवांतर वाचनाची आवड लागली. ते पाथर्डीहून नगरला आले, पुढे सर्वच ढोले कुटुंबच नगरला स्थिरावले. अकरावी श्रीतिलोक जैन विद्यालयात केल्यानंतर भाऊसाहेबांचा रेसिडेन्सिअल विद्यालयात बारावीला प्रवेश झाला. वडिलांना तुटपुंजा पगार त्यातच कुटुंबाची गुजराण चालायची. त्यात बहिणींची शिक्षणही चाललेली. चांगले गुण मिळूनही पुढे मात्र व्यावसायिक शिक्षण घेता आलं नाही. बीसीएस केल्यानंतर पुढे एके ठिकाणी खासगी नोकरी केली.
वडीलांनी आवडणाऱ्या क्षेत्रात करिअर करायची मोकळीक दिली होती. त्यामुळे हेच कर असा दबाव नव्हता. परंतु ते पत्रकार असल्याने पोलिस खात्याशी संपर्क आलेला. लहानपणापासून कुठेतरी वर्दीविषयी मनात आदर होता. तो आणखी वाढला. ठरलं पोलिसांत जायचं. परंतु त्यासाठी अनेक संकटे आडवी आली. पुढे शोधाशोध सुरू झाली आणि नगर महापालिकेच्या अभ्यासिकेचा मार्ग सापडला. स्वयंअध्ययनावर भर दिला. जेमतेम दोन वर्षांचा अभ्यास झाला असेल लगेच एसटीआय विक्रीकर अधिकारी साठी निवड झाली. नोकरी लागल्यानंतरही संघर्ष थांबलेला नव्हता. स्पर्धा परीक्षेची तयारी चालूच होती. नोकरी आणि अभ्यास दोन्ही चालू होते. तरीही दोन वर्षे स्वप्न हुलकावणी देत होते… अखेर तो दिवस उजाडलाच आणि भाऊसाहेब डीवायएसपी झाले.
गडचिरोली येथे सन २०१९ मध्ये १५ पोलिस शहीद झाले होते. या भागात नक्षलवाद्यांच्या दहशतीने भीतीदायक वातावरण होते. याच काळात श्री.ढोले यांनी गडचिरोलीला बदली करून घेतली. तेथे सी-६० पथकाचे नेतृत्व करताना मोठी कामगिरी बजावली. सव्वा दोन वर्षांत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून ६५ नक्षल्यांना कंठस्नान घातले. काही शरण आले. किस्नेलीच्या मोहिमेत स्वतः पाच नक्षल्यांना यमसदनी धाडले. याबद्दल त्यांना त्यावेळी पोलिस महासंचालकांचे पदक ही प्राप्त झाले होते.