Take a fresh look at your lifestyle.

हात नाही तोडता आले… तर तंगडी तोडा

बंडखोर आमदारांचे आक्षेपार्ह विधान

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या भाषणामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. मागोठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर कोकणीपाडा बुद्धव विहार येथील कार्यक्रमात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषणावर आक्षेप घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांनी दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. कायदा, सुव्यवस्था, लोकशाही संविधान यांचे धिंडवडे करणाऱ्या या आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.
▪️नेमकं प्रकरण काय?
मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता दहिसर कोकणीपाडा बुद्धविहार येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्याना संबोधून चिथावणीखोर व प्रक्षोभक भाषण केले आहे, असा आरोप उदेश पाटेकर यांनी केला. उदेश पाटेकर यांनी त्या कार्यक्रमाची फेसबूक लाईव्ह लिंक देखील शेअर केली आहे. शशांक पांडे या फेसबुक अकाऊंटवरुन ते लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. प्रकाश सुर्वे त्या भाषणात ठोकून काढा, कापून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी, तोडा, दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देतो. कोथळा फाढल्याशिवाय सोडणार नाही.. अशी चिथावणीखोर वाक्याचा समावेश आहे. यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील पोलिसांना देत असल्याचं उदेश पाटेकर म्हणाले.
आज लोकशाही प्रधान देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जर देशाच्या संविधानाचे लोकशाहीचे विश्वस्त समजले जाणारे आमदारच जर अशी प्रक्षोभक भाषणे करुन तरुण कार्यकर्त्याना तुम्ही गुन्हेगारी करा मी तुम्हाला सोडून आणेण, असे बोलून लोकशाहीची थट्टा करणार असतील, प्रभागात जीवे मारण्याच्या जाहीर धमक्या लोकांना देणार असतील तर हे अतिशय लज्जास्पद व संताप जनक आहे, असे उदेश पाटेकर यांनी म्हटले आहे. कायदा, सुव्यवस्था, लोकशाही संविधान यांचे धिंडवडे काढणाऱ्या या आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वर आयपीसी कलम ५०३,५०६ आणि इतर कलमाखाली गुन्हे दाखल करावेत व कडक कारवाई करावी, ही विनंती पोलिसांना केल्याची माहिती उदेश पाटेकर यांनी दिली.
▪️प्रकाश सुर्वे भाषणात काय म्हणाले?
“पण आपण गाफिल राहायचे नाही, यांना यांची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही. कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही, कुणी आरे केले तर त्याला कारे करा, ठोकून काढा प्रकाश सुर्वे इथे बसलाय, कापून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो चिंता करु नका”, असे प्रकाश सुर्वे म्हणाले. आम्ही कुणाच्याही अंगावर जाणार नाही, आमच्या अंगावर आलात तर शिंगावर घेऊन कोथळा फाडल्याशिवाय सोडणार नाही, लक्षात घेऊ राहा, असे प्रकाश सुर्वे म्हणाले.
▪️सुषमा अंधारेंची टीका
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. या व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती आमदार प्रकाश सुर्वे जाहीरपणे हातपाय तोडण्याची, कापून काढण्याची कोथळा बाहेर काढण्याची भाषा करत आहेत. गृहमंत्रालय स्थापित झाले असेल तर अशा गावगुंडांचे सदस्यत्व अजुन का अबाधित आहे हे सांगावे, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी प्रकाश सुर्वे यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.