Take a fresh look at your lifestyle.

शोधायला गेले गांजा, सापडलं मोठं घबाड !

हाती लागली सव्वा कोटीची रोकड अन् सोन्याची बिस्किट

बेहरामपूर : ओडिशामध्ये महाराष्ट्रातल्या एका व्यावसायिकाकडे मोठं घबाड सापडले आहे.त्याच्याकडे 1 कोटी 21 लाख 97 हजारांची रोकड सापडली असून सोबत 20 सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली आहेत. गांजा तस्करीप्रकरणी बसमध्ये तपास करत असताना ही रक्कम पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.
बसमधून गांजा तस्करी केली जात असल्याची माहिती ओडिशातील बेहरामपूर पोलिसांना लागली होती. त्यामुळे पोलिसांनी नाकाबंदी करुन तपास सुरू केला. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी दशरथ सावकार नावाच्या एका व्यापाराला ताब्यात घेतले आहे. हा व्यापारी सांगली जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते.
बेहरामपूरच्या आनंद ज्वेलर्स या दुकानात हे सोनं देण्यासाठी तो व्यापारी येत होता. त्यावेळी बेहरामपूर पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त केला. या व्यापाराकडे सापडलेल्या रोख रक्कमेतील सर्व नोटा या 500 रुपयांच्या आहेत. बेहरामपूर पोलिसांनी या कारवाईची माहिती आयकर विभागाला दिली असून या पुढचा तपास हा आयकर विभाग करणार आहे.
या व्यापाऱ्याकडे सापडलेली रक्कम ही हवालासाठी वापरण्यात येत होती का याचा तपास आता आयकर विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच या व्यापाऱ्याकडे सापडलेल्या सोन्याच्या 20 बिस्किटांचे वजन हे जवळपास अडीच किलो इतके होते. हे सोनं त्याने स्मगलिंगच्या माध्यमातून मिळवलं आहे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसंच या व्यापाऱ्याचे सांगली कनेक्शन काय आहे याचा तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.