Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर ?

काँग्रेसच्या बडया नेत्याचे संकेत

औरंगाबाद: विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरुन आता महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचे दिसत आहे. महाविकासआघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही तर तो केवळ विपरीत परिस्थितीमध्ये घेतलेला निर्णय असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना केले आहे.
पटोले म्हणाले, विधानसभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता झाला, विधान परिषद नेता आम्हाला हवा होता बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवले नाही आणि नेता निवडला. हे आम्हाला साधे विचारायला तयार नाहीत. आमच्याशी बोलायला तयार नाहीत.
आमची आघाडी विपरीत परिस्थिती मध्ये झाली होती आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. असे म्हणत पटोले यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला आहे.
पटोले पुढे म्हणाले आम्ही विरोधीपक्षात बसणार होतो. जनतेच्या हितासाठी विपरीत परिस्थित आम्ही आघाडीत गेलो. तसेच आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आला होतात हे लक्षात ठेवावे.येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीने लढावे की नाही याबाबतचा निर्णय कार्यकर्ते घेतील, आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही. एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायची भूमिका काँग्रेसची नाही असे म्हणत त्यांनी मित्र पक्षांना टोला लगावला.
तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट घेतली या भेटीत ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करण्याबाबत तत्वता मान्य केल्याचे सांगितले आहे.