Take a fresh look at your lifestyle.

‘पारनेर’ साखर कारखान्यातील घोटाळेबाजांना हिशोब द्यावाच लागणार !

माजी खा.किरीट सोमय्या यांनी साधला शेतकरी,कामगारांशी संवाद.

 

पारनेर : पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत झालेल्या घोटाळ्याबाबत आपणास मोदी सरकारचा निरोप आला होता. या कारखान्याच्या विक्रीत कोणी घोटाळा आणि मस्ती करून गरीब शेतकरी व मजुरांच्या नावावर बंगले बांधण्याचा विचार करीत असेल तर त्यांची मस्ती उतरवण्याचे काम आपण करणार असल्याचे सांगत घोटाळेबाजांना घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागेल असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.
पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत झालेल्या घोटाळ्याबाबत कारखाना बचाव कृती समितीने किरीट सोमय्या यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली होती. यानंतर सोमय्या यांनी आज पारनेर कारखाना कार्यस्थळावर भेट देऊन कामगार व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बचाव समितीचे रामदास घावटे, बबनराव कवाद, साहेबराव मोरे यांच्यासह शेतकरी, कामगार व सभासद उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, शेतकरी हिताचे रक्षण करून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आपण येथे आलो आहोत. शेतकरी व शेतमजुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी लखपती, करोडपती होण्याचा विचार करत असेल तसेच शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करून न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या बंदुकीच्या गोळ्या आमच्याकडे असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेत आता जागृती निर्माण झाली आहे.कोल्हापुरातही असाच घोटाळा झाला आहे परंतु या ठिकाणी आपणास जाऊ दिले नाही. त्या रात्री राज्यातील जनता किरीट सोमय्या आगे बढो म्हणत रात्रभर जागी होती असेही त्यांनी सांगितले.
बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन माहिती दिल्यानंतर डॉ. कराड यांनी आपणाशी संपर्क साधून या प्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना केल्या होत्या. आपल्याच तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक यांनीही केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. असे अण्णा हजारे यांचे नाव न घेता सोमय्या यांनी सांगितले.
यावेळी आपण पारनेरलाच येऊन माहिती घेणार असल्याचे बचाव कृती समितीच्या सदस्यांना सांगितले होते.कारखान्यातील घोटाळ्याचा हिशोब घोटाळेबाजांना द्यावाच लागणार असल्याचे सांगत या घोटाळ्यातील रक्कम कामगार व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करत या कारखान्याची चौकशी सुरू झालेली आहे, पुरावेही उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शेतकरी व कामगारांना न्याय मिळणारच असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.