Take a fresh look at your lifestyle.

‘येथे’ झाली चिठ्ठीतून सरपंचाची निवड

श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी ग्रामपंचायतमधे पदाधिकारी निवडीत बलाबल सारखे असल्याने चिठ्ठीतून ठकसेन ( काका ) पोपटराव शिर्के यांची सरपंच पदी निवड झाली.
माजी सरपंच अप्पासाहेब शिर्के यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्थानी मंगळवार दि. ९ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकारी निवड कार्यक्रम पार पडला. त्यापूर्वी दोन दिवस आधी माजी सरपंच अप्पासाहेब शिर्के यांचे आकस्मात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे पदाधिकारी निवडीत दोन्ही बाजूने मताचे बलाबल सारखे झाले. निवडीच्या वेळी बिनविरोधचा प्रयत्न फसला आणि सरपंच पदासाठी अविनाश गावडे, काका शिर्के व अरविंद वंजारे या तिघांनी अर्ज भरले. अखेर वंजारे यांनी अर्ज माघारी घेतल्याने दोन्ही बाजूने चार – चार असे बलाबल सारखे झाले. परीणामी सरपंच पदाच्या निवडीसाठी चिठ्ठीचा पर्याय काढण्यात आला. रोशनी दत्तात्रय शिर्के या चार – पाच वर्षीय चिमुकलीने चिठ्ठी काढली अन् काका शिर्के यांचे भाग्य उजळले. चिठ्ठीच्या माध्यमातून सरपंच पदी काका शिर्के यांची वर्णी लागली. निवडणूक अधिकारी म्हणून मिलिंद जाधव यांनी काम पाहिले. ग्रामसेवक विनोद ससाणे व तलाठी रुपेश भावसार यांनी सहकार्य केले.
माजी सरपंच शिर्के यांच्या आकस्मात निधनामुळे या निवडीला दुःखाची किनार लागल्याने कुणीही आनंद व्यक्त केला नाही.
यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष पोपट शिर्के, बाळासाहेब गावडे, राज शिर्के, दत्तात्रय धानगुडे, विजय गावडे, अमोल मुरकुटे, जालिंदर शिर्के, सुनिल फुलफगर, संतोष वंजारे, आबासाहेब गावडे, भाऊसाहेब शिर्के, सुरेश शिंदे आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच काका शिर्के यांनी यापूर्वी उपसरपंच पद भूषविले आहे. नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणूकीत विजयी उमेदवारांचे संख्याबळ कमी असताना त्यांनी राजकीय चुणूक दाखवत अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्या बाजूने करत सहकारी संस्थेवरही पकड मजबूत केली. सर्वसामान्य जनतेसह विरोधकांनाही विश्वासात घेऊन काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित सरपंच काका शिर्के यांनी दिली.