Take a fresh look at your lifestyle.

लोकनेत्यावर अंत्यसंस्कार ; जनता हळहळली

शिरूर : सतीश डोंगरे
भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यावर आज सायंकाळी ७ वाजता तर्डोबाचीवाडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मंत्री जिल्ह्यातील आजी माजी आमदार यासह हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव बाबुराव नगर येथील त्यांच्या रेस्ट हाऊस मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ३ वाजण्याच्या सुमारास फुलांनी सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरूवात झाली. शिरूरच्या मुख्य बाजारपेठेतून नगर रस्त्याने ही अंत्ययात्रा त्यांच्या तर्डोबाचीवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आली.
तेथून शिवतारा पर्यटन केंद्राजवळील घोडनदीकाठी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र राहुल यांनी चितेला अग्नी दिला. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहूल कुल, आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार विजय औटी, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, विजय कोलते, जयश्रीताई पलांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,दादा पाटील फराटे, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यासह पुणे जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी संपूर्ण शिरूर शहरातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
भाजपा नेते, माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. परवाच त्यांची भेट घेतली होती. शेती क्षेत्रात त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. सेंद्रिय शेतीसाठी ते आग्रही असत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
– देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शिरूर मतदारसंघातील माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या निधनाचे वृत्त खूपच वेदनादायी आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली. पाचर्णे कुटुंबीय, नातेवाईक यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
-चंद्रकांतदादा पाटील
प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष
माझे मित्र, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व, माजी आमदार कै.बाबुरावजी काशिनाथ पाचर्णे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
शिरूर हवेलीच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती सर्वांना प्राप्त होवो हीच प्रार्थना!
– ॲड.अशोक पवार
आमदार, शिरूर- हवेली
पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील शेळके परिवार ही कै. बाबुराव पाचर्णे यांची सासरवाडी. त्यामुळे त्यांचा पारनेर तालुक्याशी जिव्हाळ्याचा संबंध होता. शिरूर -हवेली मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करीत असले तरी पारनेरतील नात्यागोत्यांना त्यांचा अभिमान व आधार वाटत होता. त्यांच्या निधनाने पारनेर तालुका हळहळला. पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांचे ते मामा होत. कै. पाचर्णे यांच्या अंत्यविधीसाठी पारनेरचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.