Take a fresh look at your lifestyle.

भाजपाचे माजी आ.बाबुराव पाचर्णे यांचे निधन

शिरूर तालुक्यावर शोककळा

शिरूर : सतीश डोंगरे
गेले अनेक दिवस आजारपणामुळे अंथुरणाला खिळून असलेले शिरूर तालुक्याचे माजी आमदार लोकनेते बाबुराव पाचर्णे ( वय ७१ ) यांनी आज अखेरचा श्वास घेतला.आज दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. गेले काही दिवसांपासून ते दुर्धर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली.
दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत पार्थिव दर्शन पाचर्णे रेस्टहाउस बाबूराव नगर येथे असेल दुपारी तीन वाजता बी जे कॉर्नर येथे आणण्यात येईल त्यानंतर सायंकाळी ४ वाजता शिवतारा कृषि पर्यटन तर्डोबाचीवाडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
विधानसभेच्या सलग सहा निवडणुका लढविणारे ते तालुक्यातील एकमेव राजकीय नेते असून, त्यांची राजकीय कारकीर्द तर्डोबाची वाडी या छोट्याशा गावच्या सरपंचपदापासून सुरू झाली. तत्पूर्वी केवळ एक सामान्य तरुण म्हणून उभारी घेणाऱ्या पाचर्णे यांनी शेतीत स्वतः घाम गाळला आहे. शेतीत पडेल ती कामे करताना जनावरांना लागणारा घास विकायला ते सायकलवरून शिरूर शहर व परिसरात येत असत. शेतीच्या व शेतीमालाच्या विक्रीच्या माध्यमातून त्यांनी संपर्क निर्माण केला. एक होतकरू व कार्यक्षम तरुण म्हणून पुढे त्यांना तर्डोबाचीवाडी या गावच्या ग्रामपंचायतीत सदस्यपदाची व नंतर सरपंचपदाची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना त्यांनी गावातील तरुणांच्या मदतीने गावाच्या विकासाला चालना दिली व अल्पावधीतच तर्डोबाची वाडी हे गाव तालुक्याच्या नकाशावर आणले. त्यांना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून संधी मिळाली. त्यानंतर ते बाजार समितीचे सभापती झाले.
पुढे पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे सदस्यही झाले. १९९५ ला त्यांनी विधानसभेची पहीली निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत केवळ ६७८ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच्या ५ निवडणुका त्यांनी लढविल्या व त्यातील दोन निवडणुकांत विजय संपादन केला. कुठलाही राजकीय वरदहस्त नसतानाही पाचर्णे यांनी राजकारणात केलेली यशस्वी व नेत्रदीपक वाटचाल कायम लक्षात राहील