Take a fresh look at your lifestyle.

या पावसाने अवघडच केले ; ‘यांच्यावर’ आली उपासमारीची वेळ

पोटाची खळगी भरण्यासाठी तब्बल ५०० किलोमीटर अंतरावरून पारनेर तालुक्यात आलेल्या सुमारे दीड ते दोन हजार स्थलांतरीत शेतमजुरांना संततधार पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद,दारवा,दिग्रस,फुलसौंगी,महागाव आदी.गावांमधून हजारो शेतमजूर तालुक्यातील विशेषतः पारनेर,निघोज,भाळवणी परिसरात खरीप हंगामात मजुरीसाठी येत असतात.पिकांची खुरपणी,वाटाणा,मूग तोडणे,कांदा लागवड यासह शेतीची इतर कामे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने खरीप हंगामात या स्थलांतरित मजुरांना मोठी मागणी असते.दोन वेळचे जेवण,चहा,नाष्टा आणि मजुरांच्या जोडीला सातशे रुपये रोजाने मजुरी दिली जाते.मजुरी चांगली मिळत असल्याने तालुक्यात रोजगारासाठी येणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गेले आठ दिवस पावसाने उघडीप दिलेली नाही.तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.पावसामुळे झालेल्या चिखलात वाटाणा, मूग तोडणे, खुरपणी करणे आदी कामे शक्य नसल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध होत नाही.त्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या तुटपुंज्या रकमेतून मजुरांना वडा पाव वर तर लहान मुलांना बिस्किटे खाऊन गुजराण करावी लागते.रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांची उपासमार सुरू आहे.