Take a fresh look at your lifestyle.

खुपच वाईट घटना ; पारनेर तालुक्यातील ‘हे’ गाव हळहळले

विद्यापीठाच्या परिक्षेसाठी वाळवणे येथून पारनेरकडे निघालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सुपे पारनेर रस्त्यावर बुधवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला.
ओंकार आदीनाथ पठारे ( वय २०) व मयुर रामदास थोरात (वय १९) दोघेही वाळवणे ता. पारनेर जि. अ.नगर ही अपघातात मयत झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. ओंकार व मयुर हे पारनेर येथील न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये कॉम्युटर सायन्सच्या पहिल्या वर्गात शिकत होते. कोरोना महामारीमुळे प्रथम वर्षांच्या परीक्षा उशीरा होत असून दुपारी दोन वाजता त्यांना व्दितीय सत्र परिक्षेचा पेपर होता. त्यासाठी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते वाळवणे येथून मोटारसायकलवरून पारनेरकडे जाण्यासाठी निघाले. जांभूळ ओढयाच्या पुढे समोर चाललेल्या ट्रकला (क्र.एम. एच.१८ बी. ए.०१९८) ओलांडून पुढे जात असताना मोटारसायकल ( क्र. एम. एच.१२ एस.आर. ४८३८) घसरून ट्रकसमोर आली. मोटारसायकल ट्रकखाली अडकून दोघेही ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाले.
घटनेची माहीती समजताच सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. ट्रकखाली चिरडलेले ओंकार व मयुर यांचे मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनासाठी ते पारनेर ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर वाळवणे येथे दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ओंकार व मयुर हे दोघेही शेतकरी कुटूंबातील आहेत. ओंकार यास लहान बहिण व मयुर यास एक मोठा भाऊ आहे. दोघेही अभ्यासात हुशार होते. कॉम्प्युटर सायन्सच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देण्यापूर्वीच दोघांवर काळाने घाला घातला. त्यांच्या अकाली निधनामुळे वाळवणे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.