Take a fresh look at your lifestyle.

शिंदे सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार !

भाजप आणि शिंदे गटातील 'हे' आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ 

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र महिना लोटला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. त्यावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. मात्र, शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त लागलाय. आज सकाळी ११ वाजता राजभवनात भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी ९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. ज्या आमदारांना मंत्रिपद दिले जाणार आहे, त्या आमदारांना कालच पक्षश्रेष्ठींकडून फोन गेले आणि त्यांना मुंबई गाठण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार रात्रीतून हे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत.
▪️ भाजपकडून कोणत्या आमदारांना मंत्रिपदी वर्णी?
भाजपकडून कुणाकुणाला फोन गेले किंवा कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याची काही नावेही समोर आली आहेत. त्यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश आहे. या संभाव्य मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार हे सर्वजण रात्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आणि तिथे त्यांच्यात काही काळ चर्चाही झाली.
▪️ शिंदे गटाकडून कुणाला संधी?
शिंदे गटातील ९ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील. हाती आलेल्या माहितीनुसार आमदार गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना फोन गेले आहेत. त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश शिंदे यांनी दिले होते. त्यामुळे या आमदारांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित मानलं जात आहे.
▪️ भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार?
चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद दिल्यास, प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याकडे दिले जाऊ शकते, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु होती. अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक आणि आशिष शेलार यांचे संघटन कौशल्य लक्षात घेत पक्षश्रेष्ठींनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शेलार यांच्याकडे देण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. आता पाटील यांचे नाव मंत्रिपदासाठी नक्की झाल्यामुळे शेलारांकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे.
व्हॉट्सअँप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा