Take a fresh look at your lifestyle.

आरक्षणाचा गोंंधळ : आता सगळेच गॅसवर !

अफवांना आले उधाण इच्छुकांच्या हालचाली थंडावल्या

पारनेर : प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी आरक्षण सोडत काढताना जिल्हा प्रशासनाने सन २००७ मधील शुध्दीपत्रक विचारात न घेतल्याने निर्माण झालेल्या आरक्षणाच्या गोंधळामुळे आता सर्वच इच्छुक गॅसवर आहेत. आरक्षण सोडत पुन्हा होणार हे निश्‍चित असल्याने ज्यांच्या सोईप्रमाणे पूर्वीची सोडत झाली होती, ज्यांनी निवडणूकीची तयारीही सुरू केली होती त्यांच्यासह संभाव्य आरक्षण हटल्यानंतर निवडणूक लढविण्यासाठी तयार असलेल्या ढवळपूरी गटातील इच्छुक, पंचायत समितीच्या विविध गणांतील इच्छुक असे सगळेच गॅसवर आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी फेर आरक्षणाचे आदेश दिल्याच्या अफवांना बुधवारी दुपारनंतर उधाण आले होते. सोशल मिडीयावर तसे संदेश व्हायरल करण्यात येत होते. यासंदर्भात निवडणूक उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आरक्षणात झालेल्या चुकांसंदर्भात शुध्दीपत्र तयार करण्यात आले असून ते निवडणूक आयोगास पाठविण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ते पाठविण्यात आले नव्हते. ते पाठविण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाकडून ज्या मार्गदर्शक सुचना येतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आरक्षण जाहिर झाल्यानंतर ज्यांच्या पथ्यावर हे आरक्षण पडले आहे, त्यांनी निवडणूकीच्या तयारीला सुरूवात केली होती. गावागांमधील कार्यकर्त्यांची चाचपणी, विरोधकांमधील कोणी गळाला लागतोय का ? यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. विविध पक्षांकडून सक्षम उमेदवार कोण याचाही कानोसा घेतला जात होता. काही गट तसेच गणांमधील उमेदवारांशी प्राथमिक चर्चा करण्यात येऊन काहींना कामाला लागण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र आरक्षणामधील त्रुटींमुळे सर्वच हालचाली थंडावलेल्या आहेत. अनेक इच्छुक जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून नेमका निर्णय कधी याची विचारणा करीत आहेत.
एकंदरीत आरक्षण जाहिर झाल्यानंतर गरम झालेले वातावरण पुन्हा थंडावले आहे. पंचायत समितीचेही पुन्हा आरक्षण काढण्यात येणार असल्याने गावोगावी संभाव्य आरक्षणाच्या चर्चाही झडू लागल्या आहेत.
ढवळपूरी जिल्हा परिषद गटाचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण हटून तिथे सर्वसाधारण अथवा इतर आरक्षण लागू होईल. अनुसूचित जमाती प्रवर्गातील मतदार टाकळीढाकेश्‍वर व ढवळपूरी या गटांमध्येच जास्त आहेत. इतर गटांमध्ये आरक्षण लागू होण्याइतपत लोकसंख्या नाही. त्यामुळे पारनेर तालुक्यातील गटामध्ये हे आरक्षण पडणार नाही. जिल्हयातील लोकसंख्येने दहाव्या क्रमांकाच्या गटात ते लागू होईल.