Take a fresh look at your lifestyle.

दगडूभाऊ कपाळे यांचे निधन

भाळवणी : प्रतिनिधी
येथील धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व दगडूभाऊ बाबुराव कपाळे यांचे आज (रविवारी) अल्प आजराने निधन झाले .ते सुमारे नव्वद वर्षांचे होते. त्यांचे निधनाने भाळवणी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. दगडूभाऊ कपाळे यांचा प्रवास हरहुन्नरी कलाकार, व्यापारी, प्रगतशील शेतकरी ते अध्यात्मिक व्यक्तिमत्व असा राहिला आहे.नागेश्वर देवस्थान ट्रस्टच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. गावचा शिवरात्रीचा सप्ताह असो की, दिंडी सोहळा या कार्यक्रमात मोठा सहभाग होता व त्यांनी भाळवणीच्या सांस्कृतिक चळवळीचे मोठे योगदान दिले त्यानंतर त्यांनी तंबाखूचे व्यापारी, प्रगतशील शेतकरी यानंतर अध्यात्मात मोठे योगदान दिले. गावातील कोणत्याही धार्मिक उत्सव त्यांच्याशिवाय साजरा होत नव्हता. येथील उद्योजक संदीपशेठ कपाळे यांचे ते वडील होत. त्यांच्यावर आज सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात भाळवणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
धार्मिक, सामाजिक जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या दगडूभाऊ यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असून त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील कर्तुत्वान मनुष्य हरवल्याची प्रतिक्रिया आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.
विहिरी खोदण्याच्या मोलमजुरीच्या कामातून कुटुंबाचा नावलौकिक केला आणि पुढे धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात भाळवणी व परिसरात मोठे काम केले असे दगडूभाऊ कपाळे आज आपल्यातून गेले ही भावना मनाला सहनच होत नाही. त्यांच्या चेहर्‍यावरील तेज पाहून त्यांच्या वयाचा कधीही अंदाज आला नाही. अशा महान व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत असल्याची भावना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी व्यक्त केली.
दगडूभाऊ कपाळे यांचा नागेश्वर ट्रस्टच्या कार्याशी जवळचा संबंध होता.त्यांच्याशिवाय ट्रस्टचे पानही हालत नव्हते. आपण स्वतः अध्यक्ष असलो तरीही दगडूभाऊ यांच्यावरच जणू अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांच्या निधनाने नागेश्वर ट्रस्टची मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया नागेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संभाजीराव रोहोकले यांनी व्यक्त केली.