Take a fresh look at your lifestyle.

सामाजिक पंढरीचे विठ्ठल !

पद्मभूषण अण्णा हजारेंचा आज वाढदिवस

पारनेर : नाना करंजुले

पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे माहेरघर आहे. माझे माहेर पंढरी भिमरेच्या तीरी या उक्तीप्रमाणे अनेक जण पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी वारी करतात. आणि विठुरायाच्या चरणी लीन होतात. पंढरपूर हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे पंढरीला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विठ्ठलाला  मायबापा समजणाऱ्या अनेक वारकऱ्यांच्या हृदयात पंढरपूर वसलेले आहे. त्याचप्रमाणे सामाजिक विकास आणि कायापालट झालेल्या राळेगण सिद्धी या गावाला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. कारण या गावाने ग्रामविकासाचा त्याचबरोबर गाव करी ते राव काय करी याचा वस्तुपाठ ठेवला आहे. पुणे-अहमदनगर मार्गाच्या जवळ असलेल्या पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी या गावाने आपला झेंडा जागतिक पातळीवर पोचवला. या गावाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या रूपाने देशाला एक प्रकारे दुसरे महात्मा गांधी दिले .

अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या किसन हजारे यांनी भारतीय सैन्य दला मध्ये काम केले. देशाची सेवा इनामे इतबारे केली. क्षत्रुशी दोन  हात करीत असताना मरण जवळून पाहिले. मात्र देव बलवत्तर, ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे देशाचे संरक्षण करत असताना अण्णा यांचे प्राण वाचले. कारण त्यांच्या हातून पुढे या विधात्याला देशसेवा करून घ्यायची होती असे म्हटले तर वावगे ठरू नये. निवृत्त झाल्यानंतर अण्णा राळेगण सिद्धी मध्ये आले. सैन्य दलात काम करत असताना त्यांच्यामध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता संवेदनशीलता आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा जागृत झाली. त्यामुळे त्यांनी  अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. मोह, माया यापासून ते कधीच दूर गेले होते. गावात आल्यानंतर त्यांनी शाळेसाठी आंदोलन केले. आणि ते यशस्वी सुद्धा झाले. राळेगण-सिद्धी मध्ये हायस्कूल सुरू झाले आणि त्याला मान्यता मिळाली. त्यासाठी विद्यार्थी कमी पडत असल्याने अण्णा आणि गावकऱ्यांनी नापासांची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यात आले. आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले गेले. त्याचबरोबर त्यांच्या मनावर संस्कार रुजवण्यात आले. दोन तीन वेळा नापास झालेले विद्यार्थी फर्स्ट क्लास ने पास झाले. राज्यभरातून विद्यार्थी या ठिकाणी शाळेत येऊ लागले. पाहता पाहता अनेक मुलरूपी  गोळ्यांना वळण देण्याचे काम राळेगणमध्ये झाले. येथून शिक्षण घेऊन अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर केले. आज या गावातील नापासांची शाळा खऱ्या अर्थाने समाजासमोर  वस्तुपाठ ठेवणारी आहे. हे करत असताना पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन गावातील चाळीस दारूच्या भट्ट्या बंद केल्या.भट्टया  लावणाऱ्यांना इतर व्यवसाय करण्यासाठी मदत करण्यात आली.

राळेगण  सिद्धी मधील दुकानांमध्ये गुटखा आणि तंबाखू विक्री बंद झाली. त्यामुळे हे गाव सहाजिकच व्यसनमुक्त झाले. आजही दारू गुटखा तंबाखु मिळत नाही.राळेगण सिध्दी  गावातील जमीन ही कोरडवाहू होती. पावसाच्या पाण्यावर पिक अवलंबुन होते. दरम्यान गावकऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी विहिरी खोदल्या त्यामुळे सहाजिकच ओलिताखालील क्षेत्र वाढले. वाढीनी  ज्वारी घेणारे राळेगण कर धान्याच्या दृष्टिकोनातून सक्षम होऊ लागले. दरम्यानच्या काळामध्ये पावसाचे पाणी वाहून जात असल्याने ते जमिनी जिरत नव्हते.त्याचबरोबर मातीचीही सुद्धा धूप होत होती . या पार्श्वभूमीवर डोंगरावर माथा ते पायथा खोदण्याचा सल्ला पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी गावकऱ्यांना दिला. त्याचबरोबर ओढ्यावर बांधा टाकून पाणी अडवण्यात आले. पाहता पाहता राळेगण-सिद्धी ची भूजल पातळी वाढली. विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी आले. जलसंधारण आणि मृदसंधारणाचा एक वस्तुपाठ राळेगण सिद्धी आणि पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी ठेवला. त्याचा अवलंब पुढे सरकारने केला. आणि राज्यातच नव्हे तर देशात पाणी आडवा पाणी जिरवा ही चळवळ आणि मोहीम सुरु झाली.

आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना निमंत्रित केले. तेथेही जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाले. राळेगण सिद्धी मध्ये धान्य बँक सुरू करण्यात आली. या बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य जमा झाले. त्यातून गोरगरिबांना ते दिले जात असे पुढे सर्वजणच स्वयंपूर्ण झाल्याने धान्य बँकेतून धान्य घेण्याची गरज भासली नाही. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची चळवळ पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी सुरू केली. जनलोकपालसाठी दिल्लीत मोठे आंदोलन त्यांनी केले. अरविंद केजरीवाल त्यांच्या संपर्कात आले. ते अनेक महिने राळेगणसिद्धी येथे राहिले. त्यांचा आणि या गावाचा ऋणानुबंध आजही कायम आहे. ग्राम विकासाच्या अनुषंगाने प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी सुरु करण्यात आले. त्याचबरोबर भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे केंद्र स्थान राळेगण-सिद्धी झाले. त्यांच्या अनेक आंदोलनांमध्ये या गावाने सहभाग घेतला. अनेकदा चुलबंद आंदोलन सुद्धा राळेगणकरांनी  केले. सौर ऊर्जा चा वापर कित्येक वर्ष अगोदर राळेगण सिद्धी मध्ये झाला. गावाचा कारभार महिलांच्या हाती देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम येथे करण्यात आले. त्यानंतर महिला आरक्षणाचा जन्म झाला.

राळेगण-सिद्धी हे खऱ्या अर्थाने सामाजिक पंढरी म्हणून उदयाला आले. १३ लाखांपेक्षा जास्त जणांनी भेट देऊन येथील ग्राम विकास पाहिला. चार जणांनी राळेगण-सिद्धी वर पीएचडी केली. परदेशातून सुद्धा कित्येक जण या गावात आले. या गावातून प्रेरणा घेऊन अनेक गाव  आदर्श झाले.  या सामाजिक पंढरीची प्रत्येकाने एक तरी वारी करून येथील सामाजिक परिवर्तन प्रत्यक्षात पहावे  इतकीच यानिमित्ताने माफक अपेक्षा. सामाजिक पंढरीत वास्तव्याला असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी समाजाला दिशा दाखवली त्यातून अनेक विधायक गोष्टी पुढे आल्या आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला. देशाचे चित्र पालटवण्याची ताकद जनसामान्यांमध्ये असल्याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली.

भ्रष्टाचार मुक्त देश घडवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. व्यसनमुक्त निरोगी सक्षम पिढी निर्माण होण्याच्या अनुषंगाने पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचे प्रयत्नही कायम आहेत. सामाजिक पंढरीचे हे खऱ्या अर्थाने विठ्ठल आणि समाजकारणाचे पांडुरंग आहेत. अण्णा हे ८५ वर्षांचे झाले आहेत. आजही त्यांच्यामधील उत्साह तरुणाईला खरोखर लाजवणारा आहे. या वयातही जनहितासाठी संघर्ष करण्याची त्यांची तयारी खऱ्या अर्थाने आदर्शवत व प्रेरणादायी आहे. हिमालयासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्याबद्दल खूप काही लिहिता येईल. अनेक पुस्तकं तयार होतील. हे कोणालाही सांगण्याची गरज. अशा या सामाजिक आदर्शाला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!