Take a fresh look at your lifestyle.

कै.बाळासाहेब लंके : संघर्षातून विश्व निर्माण करणारे व्यक्तीमत्व !

 

संघर्षातून विश्‍व निर्माण केलेले असतानाही समाजकारण, राजकारणाची आवड असलेल्या स्व. बाळासाहेब लंके यांनी परोपकारी भावनेतून अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्याच पावलावर पाउल ठेऊन त्यांचे पुतणे आमदार नीलेश लंके हे समाजासाठी आहोरात्र झटत आहेत. पुतणे नीलेश हे आमदार झाल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तालुक्याच्या राजकारणातील सर्वोच्च पद घरात आल्यानंतर आता गावातील समाजकार्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्धार केलेल्या स्व. बाळासाहेब लंके यांना कोरोनाने घेरले. त्यांचे समाजकारणाचे स्वप्न अधुरे राहिले.
गरीबी पाचवीला पुजलेल्या सर्वसामान्य लंके कुटूंबियांत नानुबाई व दामोदर लंके यांच्या पोटी ७ डिसेंबर १९६२ रोजी हंगे येथे बाळासाहेबांचा जन्म झाला. चौघे भाऊ व एक बहिण असा त्यांचा परिवार. बाळासाहेबांचे प्राथमिक शिक्षण हंगे येथे तर माध्यमिक शिक्षक सुपे व पारनेर येथे झाले. त्या काळी हंग्यावरून सुपे येथे जाण्यासाठी पुरेशा बसेस नसल्याने बाळासाहेबांनी हंगे ते सुपे हे अंतर पायी जात माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. शिक्षणाची मोठी आवड तसेच बुध्दीमत्ताही चांगली, मात्र त्यांच्या शिक्षणाच्या आड येत होती ती त्यांची गरीब परिस्थिती परंतू याही परिस्थितीवर मात करीत जिद्दी स्वभाव असलेल्या बाळासाहेबांनी शिक्षण पुर्ण करायचेच हा चंग बांधला. सुटीच्या दिवशी रोजंदारीचे काम करून त्यांनी शिक्षणाच्या पैशांची तजवीज केेली. पुढे उच्च महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नगरला न्यू आर्टस कॉलेजला प्रवेश घेतला. परिस्थिती बेताची असल्याने खोली भाडे भरणेही मुश्किल होते त्यामुळे मित्रांच्या खोलीत राहून शिक्षण पुर्ण केले. जेवणासाठी गावावरून एस.टी.बसने डबा येत असे. परंतू कधी कधी बसला उशिर झाल्याने डबा मिळाला नाही तर कधी शिळा डबा, उपाशी तपाशी राहून बाळासाहेब यांनी एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. पुढे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षाही दिली. परंतू एका मार्काने त्यांची नोकरीची संधी हुकली.
भावंडात सर्वात लहान असूनही त्यांच्यावरच कुटूंबाची जबाबदारी येऊन पडली. मोठया भावांना मार्गदर्शन करीत बाळासाहेबांनी ती जबाबदारी समर्थपणे पेलवली. पुढे वैभव सेल्स कार्पोरेशन या नावाने त्यांनी बांधकाम साहित्याचे केडगांव येथे दुकान सुरू केले. सुरूवातीपासूनच परोपकारी स्वभाव असल्याने या दुकानाच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांना बांधकाम साहित्यासाठी मदत केली. हा व्यवसाय स्थिरावल्यानंतर केडगांव येथेच त्यांनी ऑईल विक्रीचे दुकान सुरू केले. पुढे ते बांधकाम व्यवसायातही उतरले. व्यवसायात स्थैर्य निर्माण झाल्यानंतर सुरूवातीपासूनच राजकिय पिंड असलेल्या बाळासाहेबांनी हंगे गावच्या समाजकारणात व राजकारणात लक्ष घातले. हंगे ग्रामपंचायतीत स्वतःचा पॅनल उभा करून ते स्वतः विजयी झाले. तालुक्यात त्यांचा मोठा मित्र परीवार होता. या मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक गावांत शैक्षणिक व बेरोजगार या विषयावर चर्चासत्र घेउन जनजागृतीचे काम केले. तत्कालीन आमदार नंदकुमार झावरे यांच्याशी त्यांचे सलोख्याचे सबंध होते. मा. आ. झावरे यांच्या प्रचार कार्यात देखील त्यांचा मोलाचा वाटा असे.
बाळासाहेब यांचे पुतणे आ. नीलेश लंके यांच्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात देखील बाळासाहेबांचा मोलाचा वाटा होता. तालुकाभर नातेगोते व मित्र परिवार असल्याने बाळासाहेबांनी गावोगावी जाऊन आ. लंके यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. निवडणूकीत पुतणे विजयी झाल्यानंतर बाळासाहेबांना अत्यंत आनंद झाला. आ. लंके विधानसभेवर निवडून गेल्यानंतर पुर्णवेळ गावात लक्ष द्यायचे अशी बाळासाहेबांची इच्छा होती. या कामास त्यांनी सुरूवातही केली होती. मात्र हे नियतीला मान्य नसावे. त्यानंतर काही महिन्यांतच कोरोनाचे संकट आले. आणि दुसऱ्या लाटेत बाळासाहेबांना कोरोनाची बाधा झाली. आ. लंके यांनी अथक प्रयत्न करूनही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. कोरोनामुळे बाळासाहेबांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी शोभाताई तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअर वर्षा सोमेश्‍वर शिंदे, सॉफ्टवेअर इंजिनिअर पुजा बाळासाहेब लंके या कन्या तर सिव्हील इंजिनिअर असणारा वैभव हा मुलगा आहे. तो देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बांधकाम व्यवसायात कार्यरत आहे. जिद्दी व करारी बाणा असणाऱ्या स्व. बाळासाहेब लंके यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
▪️चंद्रकांत मोढवे
थेट विलासराव देशमुखांशी संबंध
केडगांव येथे व्यवसाय करीत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्याशी बाळासाहेबांचा घनिष्ठ सबंध आला. कोतकरांच्या समाजकारण व राजकारणातही बाळासाहेब त्यांना आपल्या परीने मदत करीत होते. या माध्यमातूनच तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्याशी देखील बाळासाहेबांची जवळीक निर्माण झाले. स्व. देशमुख हे बाळासाहेबांना थेट नावाने ओळखत.