Take a fresh look at your lifestyle.

सुप्यात मारहाण करून पावणेचार लाखांचा ऐवज लांबविला !

सुप्याच्या खडकवाडीतून लाखाची चोरी

सुपा : प्रतिनिधी
सुपे येथील अपधूप रस्त्यावरील एम.आय.डी.सी. सबस्टेशन जवळील राजाराम फंड यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून मारहाण करीत सुमारे पावणेचार लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. सुप्यातील खडकवाडी येथून शेतकऱ्याच्या घरात घुसून एक लाखांची रोकड लांबविण्यात आली तर रूईछत्रपती येथून बाबुर्डी ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेच्या स्टार्टरची चोरी करण्यात आली.
        या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की,दि.५ मे रोजी रात्री ११ वाजता राजाराम फंड, नंदीनी फंड व दर्शन फंड हे जेवण करून झोपल्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अज्ञात इसमांनी फंड यांच्या बंगल्याचे दार तोडून बंगल्यात प्रवेश केला. त्यांनी तिघांनाही उठवून राजाराम फंड यांच्या डोळयात मिरचीची पुड टाकून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. दहशत निर्माण करून चोरटयांनी तिघांजवळील मोबाईल ताब्यात घेतले.
मारहाण करून दशहत निर्माण करण्यात आल्याने भितीमुळे नंदीनी फंड यांनी त्यांच्या गळयातील मीनी गंठण, व कानातील सोन्याची फुले काढून चोरटयांच्या हवाली केले. दरम्यानच्या काळात दोन चोरटयांनी बेडरूमध्ये जाऊन तेथील लोखंडी कपाट उघडून कपाटातील सोन्याचे पाच तोळयांचे गंठण, सोन्याच्या बाळया तसेच रोख रक्कम ताब्यात घेतली. कपाटातील बँक लॉकरच्या चाव्या तसेच सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्याही चोरटयांनी लांबविल्या. ऐवज ताब्यात घेतल्यानंतर चोरटयांनी पुन्हा राजाराम फंड यांच्या पायावर लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्यांना जखमी केले.
     राजाराम फंड यांचा मुलगा दर्शन हा वाकडेवाडी शिवाजीनगर, पुणे येथील लेन्ट्रा कंपनीत नोकरीस आहे. कंपनीने त्याला दिलेला लिनीओ कंपनीचा लॅपटॉपही बंगल्यातून बाहेर पडताना चोरटयांनी लांबविला. अनोळखी तिन ते चार चोरटे हिंदीमध्ये संभाषण करीत होते. त्यांनी टी शर्ट व हाप पॅन्ट परीधान केलेली होती. २० ते २५ वयोगटातील मध्यम बांध्याचे व त्यांनी तोंडास कापड बांधून चेहरे झाकलेेले होते.
▪️लॅपटॉप मोबाईल पोलिसांच्या हाती
चोरटयांनी चोरलेले लॅपटॉप तसेच तिन्ही मोबाईल पोलिसांच्या हाती लागले असून चोरटयांचा लवकरच शोध लागेल, आम्ही त्यांच्या जवळ पोहचलो आहोत असे पोलिस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांनी सांगितले.
▪️बाबुर्डीच्या पाणी योजनेच्या स्टार्टरची चोरी
बाबुर्डी गावास पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेचा मोटारीचा स्टार्टर अज्ञात चोरटयाने रूईछत्रपती येथील पाझर तलावाजवळील विहीरीवरील मोटारीचा स्टार्टर अज्ञात चोरटयाने चोरून नेला.
बाबुर्डी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी शांताराम आनंदराव लगड यांनी यासंदर्भात सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दि.३ मे रोजी दुपारी ३ ते ५ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने स्टार्टर चोरून नेला. बाबुुर्डी ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा योजना रूईछत्रपती पाझर तलावाजवळील विहीरीवरून आहे. तेथून बाबुर्डीस नियमित पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायत कार्मचारी शांताराम लगड हे पाणीपुरवठयाचे काम पाहतात. विहीरीवरील पत्रयाच्या पेटीसह अ‍ॅटो मोबाईल स्टार्टर सिमकार्डसह चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
▪️घरातून १ लाख रूपये लांबविले
खडकवाडी (सुपे ) येथील बाबासाहेब रामभाऊ पवार यांच्या राहत्या घरात घुसून अज्ञात चोरटयाने एक लाख रूपये चोरून नेल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली. पहाटे ३.३० ते ३.५० या विस मिनिटांच्या कालावधीत अज्ञात चोरटयाने घरात घुसून एक लाख रूपयांची रक्कम हस्तगत केली. मिळालेल्या माहीतीनुसार पवार हे पहाटे लघुशंकेसाठी घराबाहेर पडले. घराचा दरवाजा लोटून ते गेले असता अज्ञात चोरटयाने तीच संधी साधून तो घरात घुसला. घरातील सामानाची उचकापाचक करून घरात ठेवलेली एक लाख रूपयांची रक्कम घेऊन चोरटा पसार झाला. बाबासाहेब पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.