Take a fresh look at your lifestyle.

अन्न हे पुर्णब्रम्ह आहे !

त्याचा योग्य रीतीने स्विकार व्हायला हवा.

 

शरीरात उर्जा निर्माण करण्याचं काम अन्न करते. त्याच बरोबर विकार निर्माण करण्याचही काम अन्नामार्फतच होते.जगण्याचा मुख्य आधार म्हणजे अन्न.
अन्न ग्रहण करण्याची पद्धत चुकली,अवेळ झाली तरी परिणाम भोगावे लागतात.मनुष्याने सद्विवेकानेच अन्न ग्रहण केले पाहिजे.
तुकोबाराय म्हणतात,काही नित्यनेमाविण।अन्न खाय तो श्वान।।वाया मनुष्यपण।भार वाहे तो वृषभ।। महाराज म्हणतात नेमाशिवाय जो सतत खात रहातो तो कुत्रा समजावा.तो मनुष्य नसुन भार वाहणारा बैलच आहे असं समजावं. आहार नियमनाशिवाय जेवण होत असेल तर त्याचा दुष्परिणाम होणारच.म्हणून महाराज म्हणतात, युक्त आहार वेहार।नेम इंद्रियांचा सार।नसावि बासर।निद्रा बहुभाषण।।
आहार हा युक्त असला म्हणजे ज्यापासून अपाय होणार नाही. मन हे अन्नकोषातुन तयार होते.जसं खाणार तसं गाणार असं नेहमी म्हटलं जातं.अन्न पवित्र करता आले तर विकारांपासून नक्की वाचता येईल.त्यासाठी हरीचिंतन करत भोजन घ्यावे.
पवित्र ते अन्न।हरीचिंतनी भोजन।।
आपली सध्याची भोजन पध्दत आजारांना निमंत्रण देणारी आहे. कारण जेवन करणे याला यज्ञकर्म म्हटले आहे, आता ते केवळ उदरभरण झाले आहे. मोबाईल फोनवर बोलत,टि.व्ही.पहात जेवण करण्याची आम्हाला सवय झाली आहे. पण याचे दुष्परिणाम मात्र आम्हाला आजार झाल्याशिवाय कळतच नाही.अन्न ग्रहण करताना आम्ही प्रसन्न असलं पाहिजे.ते समुदायाने ग्रहण केले तर लाभ विशेष आहे. त्यापासून अपचन,पित्त समस्या होत नाही हे आम्हाला माहिती आहे पण सहकुटुंब जेवण करायला वेळ कुणाला आहे.हरीचिंतनी भोजन घडणे तर दुरापास्तच झाले आहे.विकाराच्या पहिल्या पायरीवर तरी जाग यायला हवी.
अन्न मिळवण्यासाठी पैसा कमावणं हा उद्देश कधीच मागे पडला आहे. त्यामुळे खिसे पैशाने भरलेले आहेत.जेवणाचा डबा जवळ आहे. पण खायला वेळ नाही याहुन मोठं दुर्दैव कोणतं असावं पैसा कमावण्याच्या धुंदीत तज कळत सुद्धा नाही. पण बिघडलेलं शरीर नीट करण्यासाठी कमावलेलं गमवायची वेळ येते तेव्हाही पश्चाताप न होणं म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही श्वान,वृषभ आहोत याची खात्री होते.हे अनमोल जीवन आनंदाने जगता येण्यासाठी अन्न मिळवता येणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढच अन्नग्रहन करण्याची पद्धत आम्ही शिकणं गरजेचं आहे.
रामकृष्णहरी