Take a fresh look at your lifestyle.

तीन प्रकारच्या दुःखाने मनुष्य व्यापलेला आहे !

दुःख निवारणासाठी मार्गही आहे.

माऊली म्हणतात, आणि जात आघवे।हे नाशिवंत स्वभावे।म्हणुनी तुवा झुंजावे।पंडुकुमरा।।
हे शरीर निश्चितपणे नाश पावणार आहे. ते नाश पावण्याच्या आत उचित कर्म केले पाहिजे. हे अर्जुना तु युद्ध करण्यासाठी या रणांगणात उभा आहेस.आता तुझ्या डोक्यात युद्ध सोडून कोणतेही विचार येणे योग्य नाही.उचित कर्मानेच येरझार संपेल.चार पुरुषार्थामध्ये मोक्षगतीला नेणारा भक्तीमार्गही श्रेष्ठ सांगितला आहे.
तैसे येणेची शरीरे| शरीरा येणें सरे|
किंबहुना येरझारे| चिरा पडे||.१२/ १३६ भक्तियोग हा कर्तुत्वाचाच एक भाग आहे.
नरदेहाला तीन प्रकारची दुःख आहेत.
दरिद्राचे दुःख, पापाचे दुःख आणि जन्म मरणाचे दुःख.दारिद्र्याने आवश्यक गोष्टी मिळवणेही कठीण होते.पापकर्माने आनंद नाहीसा होतो आणि जन्माला आले की मृत्यूभय तयार होते.असं असलं तरी ज्ञानाने ही तिनही दुःख नाहीशी करता येतात. दारिद्र्य असेल तर ते स्विकारुन जगण्याची शक्ती ज्ञानमार्गात आहे. पापकर्मातुन सुटका करुन घेण्याची शक्ती ज्ञानमार्गात आहे. आणि मृत्युभय संपवण्याचीही शक्ती ज्ञानमार्गातच आहे.
तृप्ततेचा भाव जगण्याची परिपूर्णता करतो.धनाची लालसा रहात नाही. पाप केल्याचा पश्चाताप झाल्याने नवीन पाप करण्यास मन धजावत नाही.मग शरीर मोह आपोआप कमी होतो.पापकर्मातुन,भ्रष्ट आचारातुन मिळवलेलं धन कुणालाही सुखाने जगु देत नाही. हे लवकर पटणार नाही. कारण त्याने श्रीमंतीची येणारी सुज डोळ्यांना दिसते.त्याचा मोह अटोपणे भल्याभल्यांना शक्य झाले नाही. केवळ एका भक्तीमार्गानेच त्याचा मोह नाहीसा होतो.
तुकोबाराय म्हणतात,
जन धन तन।केले तृणाही समान।
तुका म्हणे आता। आम्ही मुक्तिचिया माथा।।
सगळ्याची किंमत तृणासमान म्हणजे गवत काडी सारखे असल्याची खात्री झाल्यानेच तुकोबाराय असं म्हणत आहेत. याचं मोल संपलं की मग मिळवायच काही रहातच नाही. तोच खरा मोक्ष आहे. तीच खरी मुक्तीची वाट आहे.
रामकृष्णहरी