Take a fresh look at your lifestyle.

आपला जीवनप्रवास शुद्धतेकडे जाणारा असावा !

ओढे नाले गंगेला मिळताच गंगा होऊन जातात.

जीवन नावाचा प्रवास कुणाचा कसा घडेल हे सांगता येत नाही. दुर्जन संगतीतुन सतसंगतीकडे वळताना आणि या उलटही प्रवास करताना माणसं दिसतात. हे जीवन अत्यंत क्लिष्ट आहे, नव्हे नव्हे ते आपल्या क्रियाकर्मातुन आपणच क्लिष्ट केलेले असते.एक निर्णय चुकिचा घेतला की पुढच्या अनेक पायऱ्या नव्या चुका करण्यासाठी तयार असतात.मग शुद्धीकरण होणं सोपं रहात नाही. पण कोणत्याही क्षणी निश्चयाने हा प्रवास सुरू केला तर यश निश्चितच मिळते.
माऊली म्हणतात,
जैसें तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥ ४५८ ॥
ज्याप्रमाणे जेथपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळले नाही तेथपर्यंत नाल्या, ओढ्यांच्या पाण्याला नाले, ओढे असे म्हणतात. मग ते गंगेला येऊन मिळाल्यावर ते केवळ गंगारूपच होऊन रहातात.
जीवन असच आहे. ते आनंदी जगायचं की दुःखदायक बनवायचं हे शरीर भोग सोडता सर्वस्वी आपल्या हातात आहे.पण आपण शरिरावच लक्ष केंद्रीत केल्याने मन बलवान होत नाही.शरीराबरोबरच मनाच दौर्बल्य घालवता आलं तर कोणतीही परिस्थिती आतोनात दुःख देत नाही. त्यातून लवकरच बाहेर पडता येते.दुःखात सुद्धा सुखाचा धागा सापडतो.
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्र मानवा तुझिया आयुष्याचे !
सुखदुःखाच्या धाग्यांनीच हे आयुष्य विनलेलं आहे. वस्राला सोन्याचांदीची जर वापरतात. पण किती काठा पदरापुरती,बुट्ट्यांपुरती.संपूर्ण जरीचं वस्त्र अंगावर वापरताच येणार नाही. तसं सर्व सुखानं व्याप्त जीवन आनंदाला पारखे होते.अधुमधून आलेली दुःख म्हणजे तो जरतारी काठ आहे. आयुष्य त्यानेच शोभायमान होते.म्हणून हे आयुष्यरुपी वस्र कायम स्वच्छ राहील याकडे जास्त ध्यान दिले पाहिजे.
रामकृष्णहरी