जीव जन्माला आला की त्याचं मनाशी द्वंद्व सुरू होतं.लहान बाळाच्या मनात विचार आल्यानेच त्याची खाण्याकडे ओढ लागते.जीवाचं जीवपण हा देहपिंड जसजसा मोठा होत जातो तसतसे विचार गर्दी करु लागतात.मनात विचार आला की जीव शरीर एकवटतं आणि कर्मक्रिया घडते.जीव आहे तोपर्यंत विचार थांबत नाहीत.पण प्रत्येक विचार निर्माण होण्याच्या क्रियेवर आपले नियंत्रण नसतेच.ती ईश्वरीय देणगी आहे.
जीवदशा बदण्यासाठी आपण काय करावे?हा प्रश्न पडला तरच परिवर्तन घडु लागते.मनाला सदविचारांकडे नेणारी क्रिया शिकायला हवी.
तुकोबाराय म्हणतात,
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।अंतर्बाह्य जग आणि मन।।
जीवाही आगोज पडती आघात। येऊनिया नित्य नित्य वारि।।
तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे। अवघियांचे काळे केले तोंड।।
रात्रंदिवस आम्ही युद्धासारख्या प्रसंगाचा सामना करत आहोत.
आतील बाहेरील जग आणि मनाशी देखील.
जीवावर जे आघात होत आहेत
त्यांचं हे ईश्वरा तू येऊन पुन्हा पुन्हा निवारन करतो आहेस.
तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या एका नामस्मरणाच्या बळाने ह्या सर्व वाईट गोष्टींचं तोंड आम्ही काळं करून टाकलं आहे.
हो नामस्मरण हेच मनाला विचारांची दिशा बदलायला भाग पाडते.आपण जन्माला आल्याचे सार्थक केले पाहिजे हा विचार नामस्मरणाने तयार होतो.मनाच्या इच्छा पुरवणं हे सामान्य जरी वाटत असले तरी त्यासाठी होणारी यातायात सामान्य नसते.तुकोबाराय त्याला युद्ध संबोधतात.
जीवाचा होणारा आटापिटा कष्ट देत असतो.मिळालेलं फळ त्या कष्टाया तुलनेत अगदीच कफल्लक असते.पण आपणच आपल्या मनाची समजूत घालत असतो.प्रत्येक क्षणाबरोबर आपली वाटचाल मृत्युकडे होत आहे याची जाणीव मनाला होत नाही तोपर्यंत हे युद्ध थांबत नाही. नामचिंतन त्याची जाणीव करुन देते.त्या विश्वंभराचं अस्तिव लक्षात आणुन देतं.मग वायफळ पळापळ बंद होते.आणि प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगण्याचा आनंद घेता येतो.