Take a fresh look at your lifestyle.

घरामधे देवघर आणि गावात मंदिरं का?

समाजव्यवस्थेचा तो एक अतुट भाग आहे.

भारतीय संस्कृती विश्वामधे श्रेष्ठ आहे.त्या संस्कृतीचा एक भाग म्हणजे देवघर आणि मंदिरं.ज्याला भारतीय संस्कृती निट समजली नाही,ते महामुर्ख याला अंधश्रद्धा म्हणतात.
पण या मागचं विज्ञान समजून घेतलय का?
आत्ताच एक घटना घडली.मंदिरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला.मग अनेक पोस्ट फिरू लागल्या.
मंदिरात बलात्कार होऊनही देव काहीच करत नाही, कारण देवच नाही हेच खरं.
खरंच असा देव नाहिच.मुळात घरातील देवघर,गावातील मंदिरं निर्माण केली कुणी? माणसानच ना? मग त्यामागची मुळ विचारधारा काय आहे? उद्देश काय आहे?याकडं रितसर दुर्लक्ष केलं जातय.
तुमचा देव जेव्हा चमत्काराशी जोडला जातो,आणि तुम्ही ते मान्य करता तेव्हा खरी अंधश्रद्धा जन्म घेते.

मंदिरात दुष्कृत्य झालं म्हणून मुर्तीतुन देवानं प्रगट होऊन त्या नालायकाला दंडित करायला हवं होतं,किंवा का दंडित केलं नाही? असा प्रश्न विचारणारे अंधश्रद्धा फोपावताहेत असं नाही का वाटत?
शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी फौजफाट्यासह निघालेल्या खानानं अनेक मंदिरांची विटंबना केली. मुर्ती फोडल्या.त्याहीवेळी देवानं काहीच केलं नव्हतं. मात्र खान मारला गेला हे दैवी वाटत नाही का? शिवाजीराजांमधे त्या देवाचं रौद्ररूप दिसत नाही का?
कुटुंब व्यवस्थेत राहून प्रपंच करणाऱ्या प्रत्येक घरात पूर्वापार देवघर आहे. त्यामागची मुळ संकल्पना समजून घ्या.
देव म्हटलं की एक पवित्र भाव।
दुसऱ्याला देण्यासाठी धाव।।
देव म्हटलं की क्षमेचा भाव।
मग तयार होतं आनंदाचं गाव।।
देव म्हटलं की आदर।
सत्यासाठी मरणालाही सादर।।
देव म्हटलं की फक्त माणूसजात।
जातपात संपुन माणुस येतो माणसात।।
मंदिर म्हटलं की नसते फक्त दगड आणि माती।
त्याच्या सहवासानं माणसं जपतात नाती।।

घरातलं देवघर त्या गृहिणीच्या मनात एक प्रेमभावना तयार करतं.ही माझी माणसं आहेत.ही भावना घराचं घरपण टिकवत असते.असे परिवार सहसा फुटत नाहीत. ते एकजिनसी रहातात.
ज्यांनी कधी आजवर देवघरापुढे बसुन देवपुजा केली नाही, त्यांनी हा प्रयोग करून पहावा.देवपुजेला बसा.घरातल्या सर्वांना यायला सांगा.तिथे बसणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा भाव तपासा.तुम्हाला ते विलक्षण प्रसन्न दिसतील.अशी प्रसन्नता तुम्ही प्रपंचातील कोणत्याही गोष्टी खरेदी करून मिळवून दाखवा.
देव नावाची शक्ती तुमचा प्रपंच सुखाचा करण्यासाठी आहे.तुमच्यात सात्विक भाव जागावा.मनुष्यतत्वाचं पालन व्हावं.घरात हिंसाचार घडू नये.व्याभिचार घडू नये.कारण तुमच्या परिवाराखेरीज देवही तुमच्या सोबत रहातोय.ही भावना तयार व्हावी हा त्या मागचा उद्देश काय वाईट आहे यात?
आज अनेक परिवार फक्त एकत्र रहातात चार भिंतीत,भावना मेलेली माणसं;
कुणाशी कुणाचं संभाषण नाही.
तरुण मुलामुलींना आईवडिलांशी बोलायला वेळ नाही. बोलण्याची ईच्छा नाही असं म्हणनं अधिक योग्य होईल.
या प्रश्नाच्या तळाशी गेलं की कळतं सारा परिवार सुशिक्षित कुणी उच्चशिक्षित,पण सुसंस्कृत नाही. जी माणसं देव मानीत नाहीत ती माणसांमधे काय देवाला पहाणार? आणि माणसांच्या काय पाया पडणार?त्यांच्या दृष्टीने ही अंधश्रद्धा आहे. प्रपंच काय फर्निचर आणि भिंतींसोबत करणार आहात का?
देवघर तुमच्या परिवाराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी समर्थ आहे.त्याकडे चमत्कार भावनेनं पाहु नका. परिवाराला सोबत घेऊन सकाळी एक श्रध्दायुक्त नमस्कार करा.सारा परिवार उल्हसित होईल. पैसे खर्चुन सुख विकत घेऊ शकाल,समाधान नाही.
मला हलके घेऊ नका.हे सारं मी अनुभव आणि अभ्यासपूर्ण बोलतो आहे.आपण हे अमलात आणाल तर आनंद तुमच्या परिवाराचा हिस्सा होईल. प्रपंचात याहुन महत्वाचं काहीही नाही. प्रत्येक परिवारात श्रध्देने आनंद निर्माण होतो.आणि तो आपणास मिळावा ही माझी तळमळ आहे.
माणसानं माणसासारखं वागावं.त्याच्यातला पशु जागा होऊ नये.या विश्वाचा मालक सारं पहातोय याचं भय माणसाला रहावं. यासाठीच देवघर आणि मंदिरांचं निर्माण आहे.आता संकल्पना बदलल्या,त्यात व्यावसायिकता आली,लुटारू आले. तरी आपला भाव तोच राहील याकडे लक्ष द्यावं.चमत्कारबुद्धी अंधश्रद्धा निर्माण करते. त्यापासून लांब राहिलं तर आजही देव तोच आहे,कुटुंबाला एकत्र घेऊन चालण्याची शक्ती देणारा.
राम कृष्ण हरी